(गुहागर / रामदास गमरे)
गुहागर तालुक्यातील तळवली या गावची सुकन्या कु. पारमी दीपाली रविंद्र पवार ही अल्पवयातच उल्लेखनीय निवेदिका म्हणून नावारूपास आली आहे. सध्या इयत्ता ८वीत शिक्षण घेणाऱ्या पारमीने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या “भीमा तुम्हा वंदना” या कार्यक्रमात अतिशय मधाळवाणीने प्रभावी, सुवाच्य निवेदन सादर करून रसिकांची मने जिंकली, तिच्या या सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कु. पारमी हिने तिच्या निवेदनकलेचे संपूर्ण श्रेय तिच्या वडिलांना म्हणजे रविंद्र पवार यांना दिले. पारमीचे वडील रविंद्र पवार यांनी २००० ते २००२ या कालावधीत गुहागर व चिपळूण परिसरातील शाळा, महाविद्यालये व सेवाभावी संस्थांमध्ये स्मरणशक्ती विकास व व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या विषयांवर तब्बल ८० विनामूल्य व्याख्याने दिली होती. सध्या ते झी टीव्हीवरील ‘शिवा’ मालिकेचे निर्मितीप्रबंधक म्हणून काम पाहत आहेत.
कु. पारमीने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच तिच्या प्राथमिक शाळेतील कार्यक्रमांतून निवेदिका म्हणून निवेदन करण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन “हसत खेळत प्रबोधन करूया” व “आपणच होम मिनिस्टर होऊया” यांसारख्या महिलांसाठी आयोजित कार्यक्रमांमध्येही तीने निवेदिका म्हणून सहभाग घेतला असून तिचे निवेदनकौशल्य दिवसेंदिवस प्रगल्भ होत आहे. येणाऱ्या २० ऑगस्ट २०२५ रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे सायंकाळी ७ वाजता सृष्टी फाउंडेशनतर्फे आयोजित हिंदी-मराठी गाण्याच्या कार्यक्रमात पारमी निवेदिका म्हणून पुन्हा एकदा आपली चमक दाखवणार आहे.
कु. पारमी पवार ही जरी बालवयात असली तरी तिच्या भाषिक अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि निवेदनशैलीमुळे ती एक उदयोन्मुख सूत्रसंचालिका म्हणून निश्चितच आश्वासक आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी तळवली ग्रामस्थ, नातेवाईक, तिचे शिक्षकवृंद व अनेक मान्यवरांनी तिला शुभेच्छा देत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.