(चिपळूण)
गावकऱ्यांच्या आरोग्याच्या जाणीवेने प्राथमिक आरोग्य केंद्र, रामपूर यांच्या वतीने दिनांक ३० जुलै २०२५ रोजी फिरती एक्स-रे व्हॅन सेवा गावात उपलब्ध करून देण्यात आली. सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात मोफत छातीचा एक्स-रे करण्यात आला. विशेषतः खोकला, ताप, दम लागणे, बी.पी. व डायबेटीसचे रुग्ण तसेच ६० वर्षांवरील नागरिक यांच्यासाठी ही मोफत सेवा राबविण्यात आली होती.
या उपक्रमात गावातील सुमारे २०० हून अधिक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. रुग्णांची प्राथमिक चौकशी, तपासणीपूर्व माहिती संकलन आणि योग्य सल्ला देण्याची प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्यात आली.
या आरोग्य मोहिमेत ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील कृषीसखा ग्रुपचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून पुढे सरसावले. त्यांनी रुग्णांची नोंदणी, रांगांचे नियोजन, एक्स-रे प्रक्रियेत मदत, माहितीपत्रके वाटप आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक योगदानामुळे ग्रामस्थांमध्ये विश्वास आणि आश्वासकता निर्माण झाली. त्यांची सेवा वृत्ती आणि शिस्तबद्ध कामकाजामुळे संपूर्ण उपक्रम अत्यंत सुरळीतरीत्या पार पडला.
आरोग्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व ग्रामस्थांचा प्रतिसाद
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनराज मुंढे आणि डॉ. निकिता शिर्के यांनी सांगितले, “फिरती एक्स-रे सेवा ही ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. फुफ्फुसविकार, क्षयरोग (टी.बी.) किंवा न्यूमोनियासारखे आजार लवकर ओळखण्यासाठी छातीचा एक्स-रे फार उपयुक्त ठरतो.”
सदर प्रसंगी डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. श्रीकांत तुपे आणि डॉ. निलेश हळदे यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय कर्मचारीवर्ग उपस्थित होता. ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा सेवा नियमितपणे व्हाव्यात, अशी अपेक्षा मांडली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आजारी रुग्ण यांना गावातच तपासणीची सुविधा मिळाल्याने मोठी गैरसोय टळली.
या शिबिरासाठी कृषीसखा ग्रुपचे स्वयंसेवक आनंद नलावडे, स्वयं बारी, अनिरुद्ध घंटे, सत्यजित आसने, घनश्याम राऊत, ईशान डुंबरे, साहिल रसाळ, प्रतिक नाईक, श्रेयस सावंत, अंकुश पवार आणि रुदुल आखाडे यांनी उल्लेखनीय योगदान दिले.