(चिपळूण)
शहरातील सती येथील रॉयल इनफिल्ड शोरूममध्ये सर्विसिंगसाठी ठेवलेली काळ्या रंगाची क्लासिक बुलेट गाडी (MH-08-AW-7071) चोरट्याने चक्क शोरूममधूनच लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी सर्वेश उमेश साळुंखे (वय २२, रा. मार्कडी, गुलमोहर अपार्टमेंट, रूम नं. १०२, ता. चिपळूण) यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सुरज सुनील चव्हाण (रा. मार्ग ताम्हाणे) यांनी शोरूममध्ये सर्व्हिसिंगसाठी गाडी दिली होती. दरम्यान, ४ जुलै २०२५ च्या रात्री २ ते ३ च्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांची कोणतीही संमती न घेता लबाडीच्या इराद्याने गाडी चोरून नेली.
चोरीस गेलेली गाडी अंदाजे १,२०,००० रुपयांची असून, याप्रकरणी मारुती आत्माराम मेस्त्री (वय २६, रा. नागावे, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध गु.र.नं. १६२/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.