(चिपळूण / प्रतिनिधी)
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत शिवसेनेच्या वतीने सोमवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची भेट घेण्यात आली. प्राण्यांवर व नागरिकांवर होणारे हल्ले वाढले असून, प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला.
या वेळी मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले की, कायद्यानुसार आम्ही कुत्र्यांची नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरण करू शकतो. मात्र त्यांना शहराबाहेर हलविणे किंवा इतरत्र नेणे शक्य नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, प्राणीप्रेमी आणि नागरिक यांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली आहे.
शिवसेना शहरप्रमुख उमेशदादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखालील या शिष्टमंडळात माजी नगरसेवक महंमद फकीर, करामत मिठागरी, अंकुश आवले, राकेश देवळेकर, कपिल शिर्के, रश्मी गोखले, प्राजक्ता टकले, राणी महाडिक, प्रिया शिंदे, विनोद पिल्ले, सुकन्या चव्हाण, स्मिता खंडारे सुवर्णा साडविलकर, दिशा किंजळकर, तृप्ती कदम, संध्या घाडगे, अपर्णा पवार, मनाली माने शितल सावंत आदींचा समावेश होता.
चार दिवसांपूर्वी सादर केलेल्या निवेदनावरही या वेळी चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांनी आतापर्यंत प्रत्येकवेळी पाचशे कुत्र्यांची नसबंदी झाल्याचे फोटो शिष्टमंडळाला दाखवले. मात्र नसबंदीनंतर कुत्र्यांच्या कानावर टॅग का लावले गेले नाहीत, असा सवाल उमेश सकपाळ यांनी केला. त्यावर पुढील वेळी टॅग लावून त्याचे फोटो नोंदविण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
शहरात वारंवार लहान पिल्ले फिरताना दिसत असल्याने नसबंदी प्रक्रियेची कार्यक्षमता संशयास्पद असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. “सप्टेंबर अखेर निविदा प्रक्रिया पार पाडून आणखी पाचशे कुत्र्यांची नसबंदी केली जाईल. कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील,” असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

