( नवी दिल्ली )
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला असून, त्यांनी हा निर्णय आरोग्याच्या कारणामुळे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या अधिकृत पत्राद्वारे त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
धनखड यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे.
पदाचा राजीनामा देताना त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. आपल्या भावनिक शब्दांत त्यांनी लिहिले, माझ्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी दिलेला पाठिंबा आणि सहकार्य अभूतपूर्व होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मी विशेष उल्लेख करतो, कारण त्यांच्या अमूल्य पाठिंब्यामुळे माझे कार्य अधिक समृद्ध झाले. या कालावधीत मी अनेक महत्त्वाचे धडे शिकलो.
धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी जबाबदाऱ्यांबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.