(संगमेश्वर / एजाज पटेल)
तेर्ये बुरंबी (ता. संगमेश्वर) येथे मंगळवारी मध्यरात्री वसंत शिवराम चव्हाण यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या या शेळीला वेळीच उपचार मिळाले नाहीत. परिणामी, रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असलेल्या शेळीचा अखेर मृत्यू झाला.
वसंत चव्हाण यांचा गोठा त्यांच्या घराशेजारी असून, रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी शेळ्या आत बंदिस्त केल्या होत्या. पहाटे चारच्या सुमारास शेळ्यांच्या धडपडीचा व किंकाळ्यांचा आवाज ऐकून ते धावून गेले. गोठ्यात शिरकाव केलेल्या बिबट्याने एका शेळीला गाठले होते. मात्र चव्हाण यांच्या आवाजाने बिबट्याने तेथून पळ काढला. यावेळी एक शेळी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती, तर बाकीच्या शेळ्या भेदरून ओरडत होत्या.
पशुधन पर्यवेक्षिकेचा तातडीच्या उपचारास नकार
जखमी शेळीला तातडीने उपचारांची गरज असल्याचे लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य आनंद घवाळी यांनी संबंधित पशुधन पर्यवेक्षिकेशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी घटनास्थळी येण्यास नकार देऊन, खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्या असा सल्ला दिला आणि पुढे संभाषण न करता कॉल कट केला. या वागण्यामुळे ग्रामस्थ संतापले. सदर शेळीला तातडीच्या उपचाराची गरज होती
नंतर तालुका पशुधन अधिकारी युवराज शेट्ये यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन शेळीवर उपचार केले. मात्र, उपचाराला झालेला विलंब घातक ठरला. शेळी पशुपालक चव्हाण यांच्यासमोर मृत झाली.
वनविभागही उशिराने दाखल
दरम्यान, घटनेची माहिती सकाळी लवकर देण्यात आली होती; देवरुखपासून अवघ्या सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरंबी येथे वनविभागाचे कर्मचारी दुपारी उशिराने पोहोचले. त्यामुळे प्रशासनाकडून पशुपालकांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित करण्यात आला.
पशुधन पर्यवेक्षिकेचा तातडीच्या उपचारास नकार आणि पशुधन अधिकारी वेळेवर दाखल झाले तरी उपचार सुरू होईपर्यंत फार उशीर झाल्याने शेळीने अखेर तडफडत प्राण सोडले. यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त होत आहे.