(मुंबई)
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी मोठा उत्सव आहे. या उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक, विशेषतः मुंबई आणि पुणे येथून, आपल्या मूळ गावी येतात. या काळात प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे गर्दी वाढते आणि रेल्वे आरक्षण मिळवणे कठीण होते. गणेशोत्सव २०२५ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाला अधिक सुलभ व आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने गणेशोत्सवासाठी 342 विशेष गाड्या चालवून चांगला प्रतिसाद दिला होता. यावर्षी भाविकांचा प्रवास अनुभव आणखी सुधारण्यासाठी खासदार राणे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये, मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांना चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणार्या विशेष रेल्वे सेवांची संख्या वाढवावी. प्रवाशांना प्रवासाची योजना आगाऊ करता यावी आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळता यावी यासाठी या विशेष गाड्यांची वेळेवर घोषणा आणि आरक्षण सुरू करणे सुनिश्चित करावे, असे नमूद केले होते. या बैठकीदरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी कोणताही त्रास होणार नाही याची ग्वाही दिली होती.
या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या विशेषतः गणेशभक्त, सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि त्यांना सुट्टीचा आनंद अधिक निर्बंधांशिवाय घेता येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
या विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग व थांबे यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१) क्रमांक ०११३१ / ०११३२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (आठवड्यातून दोनदा):
गाडी क्रमांक ०११३१ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (आठवड्यातून दोनदा) २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी २२:२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (द्वि-साप्ताहिक) सावंतवाडी रोडवरून २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी २३:२० वाजता सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी १२:३० वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण २२ कोच = ३ टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०६ कोच, एसएलआर – ०२.
२) ट्रेन क्रमांक ०११३३ / ०११३४ दिवा जंक्शन – खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक):
गाडी क्रमांक ०११३३ दिवा जंक्शन – खेड मेमू स्पेशल (दैनिक) २२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५ पर्यंत दररोज दिवा जंक्शन येथून दुपारी १:४० वाजता सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री २०:०० वाजता खेड येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३४ खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक) २३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५ पर्यंत दररोज सकाळी ८:०० वाजता खेड येथून निघेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:०० वाजता दिवा जंक्शन येथे पोहोचेल.
गाडी निलजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे,दिवाणखवती,कळंबणी बुद्रुक,येथे थांबेल.
रचना : एकूण 08 मेमू कोच.
३) गाडी क्रमांक ०१००४ / ०१००३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष: )
गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष (दैनिक) दर रविवारी म्हणजे २४/०८/२०२५, ३१/०८/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून दर सोमवारी म्हणजेच २५/०८/२०२५, ०१/०९/२०२५ आणि ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
थांबे – करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
या गाड्यांसाठी आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरच त्याची ती जाहीर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त ‘शिवसेना एक्सप्रेस’ मोफत सेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाची मोफत विशेष रेल्वे सेवा यंदा उपलब्ध करून देण्यात येत असून, या सुविधेमुळे अनेक प्रवाशांना विनाखर्च आणि वेळेवर गावी पोहोचून गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे. ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. तथापि, ही सेवा केवळ पूर्वनोंदणी केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असेल. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार, सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.
या उपक्रमाचे आयोजन कुडाळ–मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सवात आपल्या मुळगावी जाण्याची धडपड करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’ हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे










