(मुंबई)
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण आले असून, मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. सीबीआयने या प्रकरणात मार्च २०२५ मध्ये दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यावर १२ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोर्टाने ही नोटीस कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून दिली असून, संबंधित तक्रारदाराला तपास यंत्रणेच्या निष्कर्षांवर आक्षेप नोंदवण्याची संधी यामध्ये दिली जाते. मुख्य महानगर दंडाधिकारी आर. डी. चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे.
२०२० मध्ये सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मीतू सिंग तसेच डॉक्टर तरुण कुमार नथुराम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. रियाच्या आरोपानुसार, या तिघांनी संगनमत करून बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतसाठी औषधे मिळवली होती. रिया म्हणाली होती की, सुशांत बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त होता आणि मानसिक आरोग्याच्या उपचारांसाठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला अनिवार्य असतो. मात्र, त्याच्या बहिणींनी एका फोन किंवा मेसेजवर डॉक्टरच्या मदतीने औषधे मिळवली, आणि यामध्ये गैरप्रकार झाला, असा तिचा आरोप होता.
सीबीआयचा निष्कर्ष आणि क्लोजर रिपोर्ट
१४ जून २०२० रोजी सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी आढळला होता. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली होती आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची चौकशीही झाली होती. सीबीआयने केलेल्या सखोल तपासानंतर, कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी कट किंवा ठोस पुरावा आढळून आला नसल्याचे स्पष्ट करत तपास बंद करण्याचा निर्णय घेतला. या क्लोजर रिपोर्टच्या आधारे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून रियाला सदर नोटीस पाठवण्यात आली आहे.