( पुणे )
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर शुक्रवारी निकाल जाहीर झाले. यंदाच्या महापालिका निवडणुका अनेक कारणांनी चर्चेत राहिल्या. त्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 23 मधील निकालाने. पुण्यातील आयुष कोमकर खूनप्रकरणातील आरोपी सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर सासू-सूना जेलमधून विजयी झाल्या आहेत. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत थेट विजय मिळवला आहे.
सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या सध्या न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांनी पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि टीका झाली होती. कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निकालातून शहरात भाजपाला मतदारांचा कौल मिळाल्याचे स्पष्ट झाले असले, तरी प्रभाग क्रमांक 23 मधील लढत वेगळीच ठरली. या प्रभागात आंदेकर कुटुंबीयांविरुद्ध काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी निवडणूक लढवली होती.
जेलमध्ये असतानाही आंदेकर कुटुंबीयांच्या वतीने जोरदार प्रचार करण्यात आला. कुटुंबीयांनी भावनिक मुद्द्यांच्या आधारे प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अखेर मतमोजणीत सोनाली आंदेकर यांनी 3,228 मतांनी, तर लक्ष्मी आंदेकर यांनी 140 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
या निकालामुळे पुणे महापालिकेच्या राजकारणात नवा वाद आणि चर्चा सुरू झाली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि राजकीय उमेदवारी या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

