(लंडन)
प्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई यांचे मंगळवारी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळाच्या आरोग्यविषयक समस्यांनंतर गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती लंडनस्थित कुटुंबीयांमधील जवळच्या सूत्रांनी दिली आहे.
गुजरातमध्ये जन्मलेले लॉर्ड देसाई हे लंडनचे संसद सदस्य असून त्यांनी भारत-ब्रिटन संबंध दृढ करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनानंतर देश-विदेशातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
“एक प्रतिष्ठित विचारवंत, लेखक आणि अर्थशास्त्रज्ञ श्री मेघनाद देसाई यांच्या निधनाने मी अत्यंत दुःखी आहे,” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले. “ते नेहमीच भारत आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेले राहिले. भारत-यूके संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले. आमच्या चर्चांदरम्यान त्यांनी दिलेले विचार व दृष्टिकोन मी नेहमी लक्षात ठेवीन. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींना माझी शोकसंवेदना. ओम शांती.”
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लॉर्ड देसाई यांनी १९६५ ते २००३ या कालावधीत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मध्ये अर्थशास्त्राचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्यांना एमेरिटस प्रोफेसर म्हणून गौरविण्यात आले. १९९२ मध्ये त्यांनी सेंटर फॉर द स्टडी ऑफ ग्लोबल गव्हर्नन्स या संशोधन संस्थेची स्थापना केली. तसेच, LSE च्या डेव्हलपमेंट स्टडीज इन्स्टिट्यूट चे ते संस्थापक सदस्य आणि संचालक देखील होते.