(चिपळूण / प्रतिनिधी)
शहरातील कायदा-सुव्यवस्थेला हादरा देणारी एक धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. भरदिवसा एका दिव्यांग तरुणाचे अपहरण करून त्याला चालत्या वाहनात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चिपळूण येथील नगरसेवक साजिद सरगुरोह यांचा चालक फैजान कर्जीकर याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, फैजान कर्जीकर (रा. मजरे काशी, चिपळूण) हे सोमवारी सकाळी कामावर जात असताना मागून आलेल्या इनोव्हा कारमधील तिघांनी त्यांचे तोंड दाबून जबरदस्तीने वाहनात कोंबले. त्यानंतर गुहागर बायपासमार्गे वाहन वेगाने नेण्यात आले. या काळात मुंबई–गोवा महामार्गावरून वालोपे, कळंबस्ते व लोटे परिसरापर्यंत फिरवत त्यांना सातत्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेदरम्यान एका महिलेनेही वाहनात प्रवेश करून शिवीगाळ व मारहाण केल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे. एका कठीण वस्तूने डोळ्यावर प्रहार केल्याने त्यांच्या डोळ्याला व कानाजवळ गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी ‘आमच्या सांगण्याप्रमाणे बोल, अन्यथा जिवंत जाळू’ अशी धमकी देत एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. त्या व्हिडिओमध्ये ‘पत्नीला जबरदस्तीने पळवून नेले व अत्याचार करून विवाह केला’ अशी खोटी कबुली देण्यास फैजान यांना भाग पाडण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रेमविवाहाच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केल्याचा आरोप पीडिताने केला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात ताबिश पेचकर, समीर पेचकर, मुस्कान दलवाई (रा. गोवळकोट रोड) व अमन नाडकर (रा. खेड) यांच्याविरुद्ध अपहरण, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, दिव्यांग तरुणावर झालेल्या या अमानुष अत्याचाराबद्दल संतापाची लाट उसळली आहे. कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

