(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोणतीही प्रशासकीय अथवा तांत्रिक मंजुरी न घेता, निविदा प्रक्रिया आणि वर्कऑर्डरशिवाय प्राणी नसबंदी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी रत्नागिरी नगरपरिषदेवर केला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधितांकडे लेखी तक्रारही दाखल केल्याची माहिती आहे.
कीर यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित प्राणी नसबंदी केंद्रासाठी ना प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली, ना तांत्रिक मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पीय ठराव, निविदा प्रक्रिया, अधिकृत वर्कऑर्डर अशा मूलभूत टप्प्यांनाही फाटा देत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. “नियम डावलून आणि प्रक्रियेला हरताळ फासत हे काम सुरू आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
शासकीय नियमानुसार कोणतेही सार्वजनिक बांधकाम हाती घेताना अंदाजपत्रक तयार करणे, त्यास तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मंजुरी मिळवणे, त्यानंतर पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवून वर्कऑर्डर देणे, प्रत्यक्ष कामादरम्यान गुणवत्ता नियंत्रण करणे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच देयके अदा करणे अशी निश्चित कार्यपद्धती आहे. मात्र या प्रकरणात ही संपूर्ण साखळी मोडीत काढण्यात आल्याचा दावा कीर यांनी केला आहे.
या घडामोडींमुळे आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय कारभारावर पुन्हा एकदा संशयाची छाया पडली असून, संबंधित कामाची तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

