(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर (नावडी) येथील ग्रामदैवत श्री निनावी देवीचा शिमगोत्सव पारंपरिक विधी, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पवित्र सोहळ्याला ग्रामस्थ, मानकरी, तरुणाई आणि भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
देवीचे मानकरी दत्ताराम (बावा) सुर्वे व अन्य मानकऱ्यांनी होमाभोवती फेरे घालून विधीवत पूजा केली. त्यानंतर अग्नी देण्याचा धार्मिक विधी पार पडला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरातून वाजत-गाजत श्री निनावी, वरदानी मानाई, वाघजाई आणि विठ्ठलाई देवींची रूपे विराजमान असलेली पालखी अंगणात आणून नृत्यसह मिरवण्यात आली. भक्तगणांनी पालखी नाचवत उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
यावेळी मानकरी बावा सुर्वे यांनी सांगितले की, श्री निनावी देवी प्रसादिक मंडळ संगमेश्वर तसेच येथील भंडारी, तेली व नाभिक समाजबांधव आणि मित्रमंडळ यांनी जुनी धार्मिक परंपरा जतन करत हा उत्सव शांततेत आणि शिस्तीत पार पाडला. तरुणाईचा उत्साह, सेवा भाव आणि एकजूट विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. अंगणात तरुणाईने रंगीबेरंगी रांगोळ्या काढून सुशोभीकरण केले. या सर्व उपक्रमांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
उत्सव काळात संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस दलाने उत्तम सहकार्य केले. राज्यातील विविध भागांतून माहेरवाशिणी, आप्तेष्ट आणि भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन भक्तीरसाचा अनुभव घेतला. पारंपरिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि आनंदी वातावरणात शिमगोत्सव उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.

