(दापोली)
दापोली एसटी आगारातून बांधतिवरेकडे निघालेली बस व समोरून येणाऱ्या पिकअप टेम्पो यांच्यात सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघाताची घटना घडली. ही धडक बांधतिवरे बसस्टॉपच्या काही अंतरावरच झाली असून, अपघातात एसटी बसचे काही नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातातील एसटी बस क्रमांक MH 20 BL 2768 ही बांधतिवरेमार्गे आतगावकडे जात होती. याचवेळी समोरून येणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक MH 08 AP 8124 ने अरुंद रस्त्यावरून पुढे येताना समोरासमोर धडक दिली. दोन्ही वाहनांचा रस्ता संकुचित असल्याने चालकांना पुरेशी जागा मिळाली नाही आणि धडक टळली नाही. अपघाताची तीव्रता लक्षात घेता बसचे पुढील भागास मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र बसमधील प्रवासी सुरक्षित असून, कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
या प्रकरणी सचिन मानसिक राजेशिर्के (रा. टाळसुरे) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे. घटनेची चौकशी दापोली पोलीस करीत आहेत.