(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील पेठकिल्ला परिसरात श्रीराम मंदिरालगत कौटुंबिक वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. श्वानांना खाऊ घालण्याच्या कारणावरून उफाळलेल्या वादातून दिराने भावजय व भावावर काठीने मारहाण केल्याने दोघेही जखमी झाले आहेत.
याप्रकरणी फिर्यादी पर्णिका प्रवीण विलणकर (वय ५१, रा. पेठकिल्ला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीच्या सुमारास त्या घराबाहेर श्वानांना जेवण घालत असताना त्यांचे दिर नितीन पंढरीनाथ विलणकर (वय ५२) तेथे आले. यावेळी आरोपीने फिर्यादी व त्यांचे पती प्रवीण पंढरीनाथ विलणकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळीचे कारण असे आहे की, ‘श्वानांना खाऊ घातल्यामुळे परिसरात कुत्र्यांचा त्रास वाढतो,’ असे सांगत संशयिताने वाद विकोपाला नेला. या वादातून संशयित नितीन विलणकर याने हातातील काठीने फिर्यादी पर्णिका विलणकर यांच्या हातावर व कपाळावर मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या फिर्यादींचे पती प्रवीण विलणकर यांनाही कपाळावर, हातावर व पायावर काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या हाणामारीत पर्णिका विलणकर व प्रवीण विलणकर हे दोघेही जखमी झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आरोपी नितीन पंढरीनाथ विलणकर याच्याविरोधात गु.र.नं. १७४५७/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम, २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी पोलिस करत आहेत.

