(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिऱ्या नागपूर महामार्गावरील हातखंबा-खेडशी मार्गावर अज्ञात दुचाकी चालकांनी ८० वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याचे सांगून तिच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हातचलाखीने फसवून चोरून निघून गेले. ही घटना ८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अशिता बळीराम म्हापुस्कर (वय ८०, रा. हातखंबा नागपूर पेठ) त्यांची नात सोबत घेऊन दुचाकी क्रमांक एमएच ०८ बीजी ८३९७ ने खेडशी येथील डॉ. मुकादम हॉस्पिटलमध्ये जात होत्या. हातखंबा तिठा ते खेडशी रोडवर हॉटेल सिध्दाईच्या पुढे आल्यावर मागून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवले. त्याने आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले.
त्यानंतर त्या दुचाकी चालकांनी म्हापुस्कर यांना दुचाकीवरून खाली उतरण्यास लावले आणि सांगितले की, पुढे रोडवर चोऱ्या-माऱ्या सुरू आहेत, त्यामुळे तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ काढून तुमच्या पर्समध्ये ठेवा. त्याचवेळी तेथे असलेल्या एका गोऱ्या रंगाच्या आणि बारीक डोळ्यांच्या इसमाने आणि अज्ञात दुचाकी चालकांनी संगनमत करून वृद्ध महिलेची फसवणूक केली. त्यांनी आपली नकली सोन्याची चैन काढून देण्याचा बहाणा करत ती एका कागदाच्या पुडीत बांधली आणि फिर्यादी यांच्या पर्समधील सोन्याची माळ कागदात बांधण्यासाठी मागून आपल्याकडे घेतली. याच संधीचा फायदा घेत त्याने फिर्यादी यांची सोन्याची माळ आपल्याकडे ठेवून घेतली आणि त्याच्याकडील कागदाच्या पुडीतील खोटी चैन फिर्यादी यांच्या पर्समध्ये ठेवली.
त्यानंतर त्या अज्ञातांनी तेथे असलेल्या गोऱ्या रंगाच्या बारीक डोळ्यांच्या इसमाला ‘चल, तुला साहेबांकडे नेतो’ असे सांगून दुचाकीवरून ते दोघेही निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशिता म्हापुस्कर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पोलिसांसमोर सर्व प्रकार कथन केला व रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१९(२) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.