( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील अतिशय धोकादायक वळणावर मंगळवारी (२८ जुलै) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅसने भरलेला टँकर पुलावरून थेट तब्बल २५ फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. अपघात इतका भीषण होता की, टँकर उलटताच त्यातून गॅसची गळती सुरू झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अपघातावेळी टँकर चालक गंभीर जखमी झाला. प्रसंगावधान राखत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या नाणीज संस्थेच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी तात्काळ हजेरी लावत गंभीर चालकाला तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
अपघाताची माहिती मिळताच काही क्षणात ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. या गंभीर घटनेची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या कानावर पडताच ते देखील क्षणाचाही विलंब न करता स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मागोमाग होम डीवायएसपी फडके मॅडम, एलसीबीचे निरीक्षक नितीन ढेरे, आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील, RTO पोलिस अधिकारी तात्काळ पोहोचले. मध्यरात्री पोलिसांचा मोठा बंदोबस्त अपघातस्थळी आणि हातखंबा तिठ्यावर तैनात करण्यात आला. घटनास्थळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, प्रांताधिकारी जीवन देसाई, आणि अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही हजेरी लावली. गॅस गळतीमुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी एमआयडीसीचे विशेष पथक, तीन अग्निशामक बंब, रुग्णवाहिका, पोलीस, आणि महसूल यंत्रणा एकत्रितपणे कामाला लागली.
गॅस गळतीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन अपघातस्थळालगतच्या नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले. पोलिस अधीक्षक बगाटे स्वतः घटनास्थळी असल्याने गळती रोखण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. गॅसचा साठा दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये सुरक्षितरीत्या ट्रान्स्फर करण्यात आला. ही प्रक्रिया मध्यरात्री दोन वाजल्यापासून सकाळी अकरापर्यंत सुरू होती.
वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यायी मार्ग
दरम्यान, हातखंबा-पाली मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बावनदीमार्गे पालीकडे, तर लांजा मार्गावरील वाहने कुवारबाव–काजरघाटी मार्गे किंवा पावस मार्गे लांजा अशी वळवण्यात येत आहेत. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. टँकर हटवण्यासाठी तीन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या असून, मोठ्या वाहनांच्या रांगा अजूनही महामार्गावर पाहायला मिळत आहेत.
पोलिस दलाचे खडे पहारे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव रात्रीपासून घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. हातखंबा तिठ्यावर वाहने अडवून वाहतूक पोलिस आणि ग्रामीण पोलीस तैनात असून, परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. २८ जुलै रात्री अकरा वाजल्यापासून अंदाजे दहा तास उलटूनही पोलिस निरीक्षक यादव संपूर्ण घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. साधारण आणखी दोन ते तीन तास महामार्गची वाहतूक सुरळीत होण्यास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोठा अनर्थ टळला
अलीकडेच निवळी घाटात घडलेल्या गॅस टँकर अपघाताची आठवण ताजी असतानाच हातखंबा येथील ही दुसरी घटना प्रशासनासाठी आव्हान ठरली. मात्र पोलिस अधीक्षक आयपीएस नितिन बगाटे यांच्या नेतृत्वगुणांमुळे, आणि विविध यंत्रणांच्या अचूक समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला. गॅस गळतीसारख्या अत्यंत धोकादायक परिस्थितीत वेळेवर घेतलेले निर्णय, रात्रभर चाललेली बचाव कारवाई, आणि विविध घटकांमधील एकजूट यामुळे रत्नागिरी पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचा आदर्श नमुना समोर आला आहे.

