(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे हे शेवटच्या टोकाचे गाव असून येथे बीएसएनएल मोबाईल सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सतत रेंज न मिळाल्यामुळे गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले असून, याबाबत अधिकारी वर्ग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.
गावातील बहुतांश ग्रामस्थ नोकरी, व्यवसाय तसेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी सतत प्रवास करतात. याशिवाय गावात पोस्ट ऑफिस, बँका, शाळा आदी संस्था असल्याने दळणवळणासाठी मोबाइल सेवेची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र बीएसएनएलची सेवा अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, मोबाईल रेंज वारंवार गायब होत असल्याने ऑनलाईन कामकाज पूर्णपणे विस्कळीत होत आहे.
ग्रामस्थांनी वारंवार बीएसएनएलच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाकडे तक्रार नोंदवूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट दिवसेंदिवस रेंजचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे.
जर हा रेंज संबंधी प्रश्न तातडीने सोडवला गेला नाही तर पोस्ट ऑफिस, बँका आणि शैक्षणिक कार्यासह सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे बीएसएनएल कंपनीने गांभीर्याने लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.