(गावखडी / वार्ताहर)
पूर्णगड केंद्राच्यावतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा, मेर्वी येथील शिक्षिका श्रीम. संजया संजय पावसकर यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याबद्दल भावपूर्ण निरोप देण्यात आला.
या समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पूर्णगड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संजय राणे यांच्या हस्ते पावसकर मॅडम यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम मेर्वी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत पार पडला.
कार्यक्रमास केंद्र मुख्याध्यापिका सौ. भारती तायशेटये, विशेष शिक्षिका सौ. तृप्ती शिरगावकर, कुर्धे शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ नवाथे, गणेशगुळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वृंदा सावंत, मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हिदायत भाटकर, विषय शिक्षिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री. चंद्रशेखर पेटकर यांच्यासह पूर्णगड केंद्रातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सौ. शर्वरी करगुटकर यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी पावसकर मॅडम यांच्या दीर्घ व सेवाभावी शैक्षणिक कार्याचा गौरव करत, त्यांचे भावी आयुष्य सुख, समृद्धी व आनंदाने परिपूर्ण जावो, अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. हिदायत भाटकर यांनी आभार प्रदर्शन केले.

