(देवळे / प्रकाश चाळके)
मातीची मडकी व भांडी घडवणं हे कुंभार समाजाचं पारंपरिक काम. फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन विविध प्रकारची भांडी तयार करणं ही त्यांची ओळख. यावरूनच मातीचे कण गोळा करून आपलं घर बांधणाऱ्या या छोट्याशा किड्याला “कुंभार माशी” असं नाव देण्यात आलं आहे.
कुंभार माशी आपल्या तोंडातून ओल्या मातीचे छोटे छोटे गोळे आणते आणि हेरलेल्या जागी त्यांची एकएक थर रचून घर बांधते. जसं कुंभार मातीला आकार देऊन मडकी बनवतो, तसंच ही माशी आपल्या घराला सुंदर आकार देते. विशेष म्हणजे, हे घर ती प्रामुख्याने पिलांना जन्म देण्यासाठीच बांधते.
या घराचं सौंदर्य बाहेरून जितकं आकर्षक असतं, तितकंच आतमध्ये नियोजनबद्ध असतं. आत कप्पे-कप्पे केलेले असतात. पिलांसाठी स्वतंत्र कप्पा असतो, तर काही कप्प्यांमध्ये त्यांच्या वाढीच्या काळासाठी लागेल इतकं अन्न साठवलेलं असतं. हे अन्न इतर छोट्या किड्यांच्या स्वरूपात ठेवलेलं असतं, जे पिल्लांसाठी खाद्य म्हणून उपयुक्त ठरतं. घर पूर्ण झाल्यावर बाहेरून ते पूर्णपणे बंद केलं जातं.
एवढीशी माशी असूनही ती किती शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करते हे पाहून निसर्गाच्या अद्भुत कलेचं आश्चर्य वाटतं. खरं तर, निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विधात्याने विलक्षण कौशल्याने निर्माण केल्या आहेत. प्रत्येक पक्ष्याची घरटं बांधण्याची कला निराळी असते. त्यांना ती शिकवावी लागत नाही; विणीचा काळ आल्यावर प्रत्येक पक्षी अथवा कीटक सहजच आपलं घर बांधतो.