(जैतापूर / राजन लाड)
आंबोळगड ग्रामस्थांनी नुकतेच सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) प्रमोद वाघ यांचे जाहीर स्वागत करून पर्यटनवाढीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.
पर्यटन वाढले, पण चिंता कायम
आंबोळगड हे गाव अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने वेगाने विकसित होत आहे. आकर्षक समुद्रकिनारा, सुधारणारे रस्ते आणि निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यासोबतच काही सामाजिक आणि कायदेशीर अडचणीही उभ्या राहिल्याने ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली.
गैरप्रकारांवर नियंत्रणाची मागणी
ग्रामस्थांनी विशेषतः रात्री उशिरा गावात येणाऱ्या युवक-युवतींकडून गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी मांडल्या. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच, सोशल मीडियावरून गावाचे वातावरण बिघडविणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरोधातही त्वरित कारवाई व्हावी, असे आवर्जून सांगितले गेले.
चर्चेदरम्यान काही अल्पवयीन मुले ट्रिपल सीटने मोटारसायकल चालवताना आढळल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा धोकादायक प्रकारांवर कठोर उपाययोजना करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव
महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पर्यटन क्षेत्र अधिक सुरक्षित करण्याचा प्रस्ताव चर्चेत मांडण्यात आला. पोलिस प्रशासनाने या शक्यतेचा गांभीर्याने विचार सुरू केल्याचे सांगितले.
ग्रामस्थ आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून पर्यटनाचा विकास आणि कायदा-सुव्यवस्था या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
बैठकीत मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस माजी सरपंच राजाराम पारकर, हॉटेल व्यवसायिक विश्वास करगुटकर, धनेश्वर खाडये, निवृत्त पोलीस सुहास पारकर, सुनील करगोटकर, मनोज पारकर, प्रसाद करगुटकर, देवेंद्र करगुटकर, पंढरीनाथ वाडेकर, शत्रुघ्न नार्वेकर, दत्ताराम वाडेकर, संदेश करगुटकर, देवनाथ पारकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
आगामी काळात आंबोळगडमध्ये पर्यटनवाढीसोबत कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.