(रत्नागिरी)
कोकण रेल्वे मार्गावर स्लायडिंगवर थांबणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांचे दागिने व पर्स लांबविणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात लोहमार्ग पोलीस, हार्बर विभागाला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात एका आरोपीला अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली असून उर्वरित तिघे आरोपी अद्याप फरार आहेत. अटकेतील आरोपीला न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या हार्बर विभागांतर्गत 25 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याची स्थापना झाली. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या काळात कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या दागिने आणि पर्स चोरीच्या घटना वाढल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दिवाणखावली आणि शापे–बामणे या स्थानकांदरम्यान ट्रेन क्रॉसिंगसाठी साईडला उभ्या राहत असताना उघड्या खिडक्यांचा फायदा घेत प्रवाशांच्या मंगळसूत्र, चेन आणि खिडकीला लटकवलेल्या पर्स खेचून नेण्याच्या एकूण 8 तक्रारी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविल्या गेल्या होत्या.
या घटनांच्या तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांचा वापर केला. या तपासातून चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश झाला. त्यातील मुख्य आरोपी विनोद सखाराम जाधव (रा. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे.
चौकशीत आरोपीकडून 44 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ₹5 लाख 2 हजार आहे. तसेच चोरीस गेलेल्या तीन पर्स, त्यातील आधार कार्ड, इतर कागदपत्रे, दोन मोबाइल फोन आणि इतर किरकोळ साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
तपासात उघड झाले की, गाडी साईडला थांबताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन डब्यांजवळ दबा धरत. एक आरोपी जमिनीवर बसून दुसऱ्या आरोपीला खांद्यावर उभे करत असे. त्यानंतर हा आरोपी खिडकीतून हात घालून झोपलेल्या प्रवाशांच्या गळ्यातील दागिने किंवा पर्स खेचून पळ काढत असे. या घटना बहुतांश संध्याकाळी सातनंतर घडलेल्या आहेत.
या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त (रेल्वे), हार्बर विभाग नीलिमा कुलकर्णी यांनी सांगितले की, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द सुमारे 265 किमी असून 27 रेल्वे स्थानके या कार्यक्षेत्रात येतात. मनुष्यबळ कमी असूनही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून सतत प्रयत्न केले जात आहेत.
प्रवाशांनी प्रवासादरम्यान खिडक्या बंद ठेवाव्यात, मौल्यवान दागिने परिधान करणे टाळावे, पर्स व मौल्यवान वस्तू खिडकीला लटकवू नयेत आणि कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असून त्यांचे लोकेशन मिळवण्यासाठी पुढील तपास तीव्र करण्यात आला आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

