(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू असून रविवारी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कार्यालयात पाहायला मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ काही तास उरले असल्याने राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसह धावपळ सुरूच आहे.
शनिवारी २२ अर्ज दाखल झाल्यानंतर रविवारीही ३५ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले असून कागदपत्रांची पूर्तता, आवश्यक प्रतिज्ञापत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक निवडणूक कार्यालयात मोठ्या संख्येने दिसत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक वातावरणाला ताप चढत असून विविध प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचारयंत्रणा पूर्वतयारीसाठी सज्ज झाली आहे.
दरम्यान, रविवारपर्यंत दाखल झालेल्या अर्जांमधे नगराध्यक्ष पदासाठी भाजपा महायुतीकडून सौ. मृणाल शेट्ये, महाआघाडी केकडून सौ. सबुरी थरवळ, आपकडून दीक्षा खंडागळे व अनघा कांगणे यांनी तर सौ. स्मिता लाड अपक्ष यांनी अर्ज दाखल केले आहेत
नगरसेवक पदांसाठी चुरस वाढली आहे. अनेक प्रभागांत बहुकोणी लढत निर्माण होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मतविभाजनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षीय नेत्यांमध्ये रणनीती ठरवण्यासाठी बैठका सुरू आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपा, शिवसेना ठाकरे गट, आप, तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तर नगरसेवक पदांसाठी विविध पक्षांच्या गट-गटांतील कार्यकर्त्यांनी जोरदारपणे अर्ज दाखल केले आहेत.युती व महाआघाडीत काही जांगाचा तिढा असून तो लवकरच सुटणार की कसे हे लवकरच स्पष्ट होईल.
आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी मोठा ओघ अपेक्षित असून निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी अर्ज पडताळणी व स्वीकृती प्रक्रियेसाठी पूर्ण क्षमतेनं कामाला लागले आहेत.
आजपर्यंतची अर्ज दाखल प्रक्रिया आणि त्यानंतरच्या छाननीनंतर नेमकी अंतिम लढत कशी आकार घेते, याकडे देवरूख शहरातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

