(देवरूख / सुरेश सप्रे)
भाजपा कार्यकर्त्यानी मनभेद न करता सांघिक कामगिरी करुन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास, आपली वेगळी ओळख निर्माण होऊन पक्षाचे काम वाढेल व आपले अस्तित्व टिकून राहील, असे प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी केले.
कबड्डी स्पर्धेत प्रत्येक संघ विजयाच्या ईर्षेने एकसंघपणे लढत आहेत त्याप्रमाणे भाजपाच्या इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपापसातील मतभेद विसरून हातात हात घालून पक्ष वाढीसाठी ईर्षेने आणि ऊर्जेने काम करत पक्षाचे काम करून भाजपाचे राज्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अपेक्षित असलेली गौरवशाली परंपरा पुढे नेली पाहिजे, यासाठी मी संपर्क प्रमुख म्हणून तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली. ते देवरुख येथे झालेल्या भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुका पुरस्कृत दत्तनगर स्पोर्ट्स क्लब देवरुख आयोजित कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण गौरव चषक कबड्डी स्पर्धेच्या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष निलेश भुरवणे, भाजपा महिला अध्यक्षा संगिता जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष रुपेश कदम, माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभि शेट्ये, कबड्डी असोसिएशनचे अभिजीत सप्रे, भाजपा शहराध्यक्ष सुशांत मुळे, अंकूर संघाचे मार्गदर्शक व कबड्डी प्रसारक अनिल (मास्तर) घाटे जेष्ठ कबड्डीपटू व बंगाल वारीरर्सचे प्रशिक्षक प्रशांत सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.