(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, बुरंबी विद्यालयाच्या २००१-०२च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्गमित्र एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत, मैत्रीतून सामाजिक बांधिलकीचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या जुन्या इमारतीला भेट देऊन झाली. शाळेच्या आवारात फेरफटका मारताना बालपणीच्या आठवणींनी सर्वांची मनं भरून आली. जुन्या वर्गासमोर उभं राहताना घेतलेले फोटो हे त्या आठवणींचे अमूल्य दस्तावेज ठरले. यानंतर रत्नागिरी येथील ‘कोकण किंग रिसॉर्ट’मध्ये गेटटुगेदरचे आयोजन करण्यात आले. केक कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुलाबपुष्प देऊन प्रत्येकाचे स्वागत करण्यात आले. सर्वांनी आपल्या सध्याच्या व्यवसाय, करिअर व सेवाक्षेत्राबाबत माहिती देत एकमेकांशी संवाद साधला.
जुने किस्से, आठवणी, हास्य-विनोद, ग्रुप फोटो सेशन आणि धमाल रिल्स यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. काही सहभागी होऊ न शकलेल्या वर्गमित्रांना व्हिडीओ कॉलद्वारे सहभागी करून घेतले गेले, ज्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतही मैत्रीचा धागा तुटला नाही. या स्नेहमेळाव्याचे एक विशेष आणि हृदयस्पर्शी क्षण म्हणजे, अपघातामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मोहसीन या वर्गमित्राला दिले गेलेले प्रेम आणि पाठबळ. त्याच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र येत आर्थिक सहकार्याचा निर्धार केला. ही मैत्री सामाजिक बांधिलकी जपणारी ठरली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेच्या नावाचा खास कॉफी मग गणेश हर्डीकर यांनी आठवणीच्या रूपात सर्वांना भेट दिला. तर चिनार भाटियाने सर्वांना ड्रायफ्रूट्सचे पॅकेट्स भेट म्हणून दिली. या दिवसाची सांगता भावनिक निरोपाने झाली. २३ वर्षांनंतर एकत्र येण्याचा हा क्षण सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश हर्डीकर यांनी तर नियोजन बाळकृष्ण महाडिक, सतीश पवार, सूरज महाडिक, अभिषेक भाताडे, प्रमोद खेडेकर, प्रतिक्षा सावंत, रोहिणी मोहिते, शीतल पोरे आणि प्रशांत पंडित यांनी केले.

