(पुणे)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे त्यांनी आता राजकारण, क्रिकेट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच कुस्तीच्या आखाड्यातही सक्रिय पाऊल ठेवले आहे.
या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यभरातील सर्व जिल्हा संघटनांचे व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्व. मामासाहेब मोहोळ आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या या परिषदेच्या नेतृत्वाची संधी मिळणे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे भाग्य आहे. आदरणीय पवार साहेबांनी तब्बल चार दशकं या परिषदेचं नेटाने नेतृत्व केलं असून, आजही ते संघटनेचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. काही काळापूर्वी संघटनेबाबत राजकीय हेतूंनी वाद निर्माण करण्यात आले होते, मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद’ हीच खरी आणि अधिकृत संघटना असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.”
रोहित पवार पुढे म्हणाले, “जिल्हा परिषद, विधानसभा आणि क्रिकेटनंतर आता कुस्तीच्या चौथ्या मैदानात उतरून काम करण्याची संधी लाभली आहे. ही निवड आजवरच्या कार्याची पावती असून, ही संधी सोन्यासारखी घडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. राज्यातील कुस्तीला पुन्हा तिचं गतवैभव मिळवून देणं, पैलवानांसाठी मजबूत आणि हक्काचं व्यासपीठ उभारणं, त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणं आणि या मातीतल्या खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहीन. या निवडणुकीत जिल्हा कुस्ती संघटनांपासून ते पैलवान, वस्ताद, पंच आणि इतर मान्यवरांनी दिलेलं सहकार्य अमूल्य आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार! माझ्यासोबत बिनविरोध निवडून आलेले सचिव विजय बराटे, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांचेही अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!”