(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुखवासियांना दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा देण्यासाठी १८ तारखेला संध्याकाळी ६ वाजता अभिरूची संस्थेतर्फे संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात ही विशेष मैफिल होणार आहे. स्थानिक गुणी कलाकारांचा गौरव व्हावा त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात या हेतूने सदर मैफिल रंगणार आहे.
यामध्ये सौ.नेहा प्रभुघाटे-साधले, सिद्धी शितूत व कुणाल भिडे यांचे गायन होणार आहे. अभिजात संगीताने नटलेल्या या मैफिलीला अथर्व आठल्ये यांची तबलासाथ व चैतन्य पटवर्धन यांची संवादिनी साथ लाभणार आहे. या विशेष मैफलीला स्वराधिराज कोकण गंधर्व प.राजाभाउ शेंबेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
दिपोत्सवाबरोबरच संगीत मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई यांनी केले आहे.

