(दापोली)
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विरसई येथे कार्यरत असलेल्या ध्येयवेड्या व प्रेरणादायी शिक्षक श्री. संदीप काशीराम भेकत यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे.
हा सन्मान नुकताच दापोली येथे आयोजित कार्यक्रमात जनकल्याण सामाजिक संस्थेचे सदस्य श्री. सुरेश पाटील, अखिल शिक्षक संघटनेचे विजय फंड, भालचंद्र घुले, किशोर धुमाळ, केंद्रप्रमुख शशिकांत बैकर, श्री. वाळंज यांच्या हस्ते, भेकत सर आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करून सन्मान प्रदान करण्यात आला.
भेकत सरांच्या प्रेरणादायी शिक्षणपद्धतीमुळे विरसई शाळेचा स्तर लक्षणीयरीत्या उंचावला आहे. सलग तीन वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थ्यांची नासा व इस्त्रो अभ्यासदौर्यासाठी निवड, नवोदय विद्यालय प्रवेश, तसेच शिष्यवृत्ती योजना यामध्ये यशस्वी कामगिरी होत आहे.

‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धांमध्ये शाळेचे विद्यार्थी दरवर्षी सुवर्णपदकाचे मानकरी ठरतात. भेकत सर जिथे जिथे शिक्षक म्हणून कार्यरत राहिले, तिथे शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व एकूणच शाळेचा विकास घडलेला दिसतो. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची जाणीवपूर्वक जोपासना करत नासा-इस्त्रो, आर.टी.एस., गणितातील भास्कराचार्य स्पर्धा परीक्षा अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वृद्धिंगत केली आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्था आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना ‘उत्कृष्ट शिक्षकरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना भेकत सर म्हणाले, “हा सन्मान फक्त माझा नसून, माझ्या विद्यार्थ्यांचा, पालकांचा, सहकाऱ्यांचा आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याचा परिपाक आहे.” भेकत सरांच्या या यशाबद्दल तालुक्यात आणि जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

