(नवी मुंबई)
वाशी परिसरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या धावत्या लोकल ट्रेनमधून एका तरुणाने वाशीच्या खाडीत उडी मारली. ही घटना घडताच लोकलमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि आरडाओरड सुरू झाली.
उडी मारणारा तरुण भारत शिवराम फुलमाळी (वय ३८) असल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने ही उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, खाडी किनाऱ्यावर मच्छीमारीसाठी उपस्थित असलेल्या मच्छिमारांनी प्रसंगावधान राखत तत्काळ होडी खाडीत सोडली आणि जीवाची बाजी लावून भारतला पाण्यातून जिवंत बाहेर काढले.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. मच्छिमारांच्या तात्काळ मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. भारतच्या खिशात ओळखपत्र आढळून आले असून तो ‘पोलीस मित्र’ असल्याची माहिती आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील पार्थडी तालुक्यातील आंबिकानगरचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, तो सध्या मुंबईत नेमका कुठे वास्तव्यास होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भारतने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

