(लातूर)
जिल्ह्यातील एका बालसुधारगृहात वास्तव्यास असलेल्या एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित मुलीच्या तक्रारीनंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटना कशी उघडकीस आली?
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती १३ जुलै २०२३ पासून हसेगाव येथील एचआयव्ही बाधित मुलांसाठी असलेल्या एका बालसुधारगृहात राहत होती. या कालावधीत संस्थेतील एका कर्मचाऱ्याने तिच्यावर किमान चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला याबाबत कोणालाही काही सांगू नये, यासाठी धमकावले होते. विशेष म्हणजे, संस्थेच्या व्यवस्थापनाने तिला मदत करण्याऐवजी, तिने लिहिलेल्या तक्रारीचे पत्रही फाडून टाकल्याचा आरोप तिने केला आहे.
अलीकडे ती आजारी पडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे तपासणीदरम्यान ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला, असा गंभीर आरोप संबंधित अधिकाऱ्याने केला. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संस्थेचे संस्थापक, अधीक्षक, पीडितेवर अत्याचार करणारा कर्मचारी, तसेच गर्भपात करणारा डॉक्टर यांचा समावेश आहे. सदर प्रकरण औसा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या घटनेनंतर अनेक सामाजिक संघटना आणि महिला हक्क कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच HIV बाधित व्यक्तींवरील सामाजिक भेदभाव आणि त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे आणि जनजागृतीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. पीडित मुलगी सध्या सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती असून, तिला आवश्यक वैद्यकीय व मानसिक उपचार दिले जात आहेत. दरम्यान, या घटनेने प्रशासन, बालकल्याण यंत्रणा आणि समाजामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.