(कोळंबे, संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दोन ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान करत कोळंबे हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती समारंभ भावनिक वातावरणात पार पडला. श्री. संजय श्रीराम मुळे (माजी मुख्याध्यापक) आणि श्री. विजय शिवराम चव्हाण (ज्येष्ठ शिक्षक) यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला अभिवादन करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर पुष्पहार अर्पण, ईशस्तवन आणि स्वागत गीताच्या सुरेल सादरीकरणाने वातावरण अधिक मंगलमय झाले. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत दोन्ही शिक्षकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा संदेश सादर केले.
शाळेतील सहकारी शिक्षकांनी आपले अनुभव शेअर करत दोघांच्या शिक्षक म्हणून असलेल्या योगदानाचा गौरव केला. वरखेडा हायस्कूलचे अरुण मुळे सर म्हणाले, “धाडसी माणूस कधीही भीत नाही, आणि भीती बाळगणारा धाडस करू शकत नाही. कार्य करायचे असेल, तर धाडस अपरिहार्य आहे.” मुख्याध्यापक प्रभावळकर सरांनी संजय सरांबाबत भाष्य करत म्हटले, “ते आमचे प्रेमळ प्रतिस्पर्धी होते. खऱ्या अर्थाने स्पर्धा करायची असेल, तर ती कोळंबे हायस्कूलशीच करावी लागेल.” सोनाली मुळे यांनी आपल्या भावनिक मनोगतात म्हटले, “संजय सर कधीच निवांत बसलेले दिसले नाहीत. शाळा आणि विद्यार्थ्यांचे हित हेच त्यांचे आयुष्य होते.”
विजय चव्हाण सरांनी मनोगतात म्हटले, “मी आज जे काही आहे, ते या संस्थेमुळेच. या संस्थेला वेळ, मदत आणि प्रेम यांची कधीही कमतरता भासू देणार नाही.” संजय मुळे सरांनी त्यांच्या विज्ञान विषयातील अध्यापन प्रवासाचा आढावा घेत सहकाऱ्यांचे व संस्थेचे आभार मानले. “संस्थेच्या पाठबळामुळेच विविध उपक्रम राबवता आले,” असे त्यांनी नमूद केले. सचिव राजाभाऊ मुळे म्हणाले, “अडचणींना संधीमध्ये रूपांतरित करण्याची किमया या दोघांनी साधली. त्यांच्या योगदानाची भरपाई शक्य नाही.” अध्यक्ष नयन मुळे म्हणाले, “या दोघांनी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी अपार मेहनत घेतली. आमच्या शाळेचे शिक्षक दर्जेदार आणि निष्ठावान आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नयन मुळे, सचिव राजाभाऊ मुळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश जोशी आणि मुख्याध्यापक रवींद्र मुळे सर यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी कुरधुंडा केंद्रप्रमुख नाचणकर मॅडम, कोळंबे, कुरधुंडा व कोंडगाव हायस्कूलचे शिक्षकवर्ग, माजी शिक्षक ए. एन. जोशी सर, चिपळूण अर्बन बँकेचे शाखा प्रमुख हेमंत बंडखळे सर, तसेच अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शिंदे सरांनी केले, तर आभारप्रदर्शन कांबळे सरांनी केले.