(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सांची सुदेश सावंत (वय ३८, रा. हेरिटेज सोसायटी, आरोग्यमंदिर) यांचा प्रसूतीवेळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (शुक्रवारी, २५ जुलै) दुपारच्या सुमारास घडली. नवजात बालकाचाही या घटनेत मृत्यू झाला असून सावंत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सांची सावंत या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. गुरुवारी रात्री प्रसूतीसाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी अचानक त्यांना आकडी आली आणि त्या बेशुद्ध झाल्या. तातडीने दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असता दुपारी ३.१८ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सांची सावंत यांचे पती देखील पोलिस विभागात कार्यरत असून, ते श्वान पथकात पोलिस अंमलदार म्हणून सेवा बजावत आहेत. या दाम्पत्याला दोन मुली असून सांची या तिसऱ्यांदा आई होणार होत्या. मात्र, नियतीने काळाचीच भूमिका घेऊन आई आणि बाळ दोघांचाही जीव घेतल्याने परिसरासह पोलिस विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सांची सावंत यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, शहर पोलिस ठाणे, श्वान पथकाचे सहकारी तसेच शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. सावंत कुटुंबियांच्या या अपार दुःखात संपूर्ण पोलिस दलाने सहवेदना व्यक्त केल्या असून जिल्हाभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.