(देवळे / प्रकाश चाळके)
केंद्र देवळे यांच्या वतीने आयोजित पाचवी शिक्षण परिषद बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा चाफवली नं. १ येथे उत्साहात पार पडली. या परिषदेचा प्रारंभ दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आला.
चाफवली नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक परिपाठ सादर करून सभागृहात चैतन्यमय वातावरण निर्माण केले. परिपाठाचे समीक्षण श्री. संदेश गावडे सर यांनी समर्पक व प्रेरणादायी शब्दांत करत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
उपस्थित केंद्रीय प्रमुख, मुख्याध्यापक, जेष्ठ शिक्षक, पदवीधर शिक्षक व सर्व शिक्षकवृंदांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रीय प्रमुख श्री. संतोष बोडेकर सर यांनी भूषविले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून परिषदेचे प्रयोजन स्पष्ट केले आणि विषयपत्रिकेनुसार कार्यवाहीस प्रारंभ केला.
या परिषदेत अध्ययन निष्पत्तीचे नियोजन, उपक्रमनिहाय कार्यवाही आणि आराखडे तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विषयनिहाय व इयत्तानिहाय नियोजन नोव्हेंबरपासून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ‘विकसित भारत’ या प्रकल्पांतर्गत सहावी ते बारावी वर्गांसाठी असणाऱ्या निकष, लिंक आणि प्रशिक्षण कार्यवाहीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
मध्यंतरानंतर प्रशासकीय कामकाजांतील मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या हस्तपुस्तिका वितरित करण्यात आल्या. दिवाळीनंतर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. शालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती प्रस्ताव, दिव्यांग प्रस्ताव यांसारख्या तातडीच्या प्रशासकीय बाबींवरही सखोल चर्चा झाली.
देवळे केंद्रातील शिष्यवृत्ती परीक्षांसाठी जादा वर्ग व सराव चाचण्यांचे नियोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने आर्थिक सहाय्य करणाऱ्या शिक्षकांची निवडही करण्यात आली.
केंद्रीय प्रमुख श्री. बोडेकर सर यांनी केंद्र देवळेने आजवर दाखवलेले प्रशासकीय व शैक्षणिक सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन केले.
शाळा चाफवली नं. १ च्या मुख्याध्यापक श्री. गजानन मोघे सर व शिक्षकवृंद — सौ. वर्षाराणी कदम, श्रीमती निलम सोलापूरे, श्रीमती मगदूम यांनी उत्कृष्ट आयोजन करून सर्वांचे आदरातिथ्य केले. परिषदेचे सूत्रसंचालन श्रीमती निलम सोलापूरे व सौ. वर्षाराणी कदम यांनी केले.

