पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा आणि पूर्व वर्धमान जिल्ह्यांमध्ये वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एकूण १३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (२४ जुलै २०२५) घडली. बांकुरा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वीज कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेबाबत माहिती देताना बांकुरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वैभव तिवारी यांनी सांगितले की, ओंडा येथे चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर कोतुलपूर, जॉयपूर, पत्रासैर आणि इंदास या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एका व्यक्तीने प्राण गमावले आहेत.
ओंडा येथे मृत्युमुखी पडलेले नागरिक म्हणजे नारायण सार (४८), जबा बौरी (३८) आणि तिलोका मल (४९) हे शेतीकाम करत असताना वीज कोसळल्यामुळे जागीच ठार झाले, तर चौथ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच कोतुलपूर येथील जियाउल हक मोल्ला (५०), पत्रासैरमधील जिबान घोष (२०), इंदासमधील इस्माईल मोंडल (६०) आणि जॉयपूरमधील उत्तम भुनिया (३८) हे देखील विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले.
दरम्यान, पूर्व वर्धमान जिल्ह्यातही अशाच स्वरूपाच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माधबदिही येथे सनातन पत्रा (६०) आणि परिमल दास (३२) यांचा मृत्यू झाला. तसेच औसग्राम येथे रबिन तुडू (२५), रैना येथे अभिजित संत्रा (२५) आणि मंगलकोट येथे बुरो मड्डी (६४) यांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनांमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काही दिवसांमध्ये जोरदार पावसासह वीज कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि शेती व इतर बाह्य कामांदरम्यान आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, स्थानिक प्रशासन मृतांशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करत आहे. या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीत ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्याप्रती सरकारने सहवेदना व्यक्त केल्या आहेत.