(नवी दिल्ली)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध सतत कडक भूमिका घेतली आहे. या घटनेनंतर देशात सुरक्षा यंत्रणा अधिक सजग झाल्या असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर देशात सध्या भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना धोका टाळण्यासाठी गृह मंत्रालयाने ७ मे रोजी संपूर्ण देशभरात नागरी संरक्षणासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या मॉक ड्रिलचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि आपल्या परिसराचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देणे हा आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या गेल्या आहेत.
मॉक ड्रिलदरम्यान होणाऱ्या प्रमुख गोष्टी:
-
हवाई हल्ल्याचा सायरन – हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजवला जाईल, जेणेकरून नागरिक लगेच सावध होतील.
-
नागरी संरक्षण प्रशिक्षण – नागरिक आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.
-
क्रॅश ब्लॅकआउट – हल्ल्याच्या वेळी लाईट बंद करण्याची (ब्लॅकआउट) योजना अंमलात आणली जाईल, जेणेकरून शत्रूला लक्ष्य करणे कठीण जाईल.
-
तत्काळ लपण्याची व्यवस्था – झाडे वा सुरक्षित स्थळी नागरिकांनी कसे लपावे, याचे मार्गदर्शन दिले जाईल.
या प्रशिक्षणामध्ये नागरिकांना जागरूक करून त्यांच्यातील आपत्कालीन प्रतिसादक्षमता वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या ड्रिलमुळे भविष्यातील संभाव्य संकटांना सामोरे जाण्यासाठी देश सज्ज राहील. या मॉक ड्रिलमध्ये, निवडक भागांमध्ये हवाई हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनची चाचणी घेतली जाईल. जेणेकरून सार्वजनिक चेतावणी प्रणालीची कार्यक्षमता तपासता येईल. याशिवाय, विद्यार्थ्यांसह नागरिकांना हवाई हल्ले किंवा बॉम्बस्फोटांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल.
मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट रिहर्सल म्हणजे काय?
मॉक ड्रिल ही एक प्रकारची “प्रॅक्टिस” आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की जर एखादी आपत्कालीन परिस्थिती (जसे की हवाई हल्ला किंवा बॉम्ब हल्ला) आली. तर सामान्य लोक आणि प्रशासन किती आणि कसे प्रतिक्रिया देतील.
ब्लॅकआउट रिहर्सल म्हणजे संपूर्ण परिसरातील दिवे ठराविक काळासाठी बंद करणे. जर शत्रू देशाने हल्ला केला तर अंधारात परिसर कसा सुरक्षित ठेवता येईल हे दाखवणे हा त्याचा उद्देश आहे. यामुळे शत्रूला लक्ष्य करणे अवघड होऊन जाते.
54 वर्षानंतर झाला मॉक ड्रील करण्याचा निर्णय!
देशात अशा प्रकारचा शेवटचा मॉक ड्रिल 1971 मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. या कालावधीनंतर 54 वर्षानंतर पहिल्यांदाच देशपातळीवर अशा व्यापक स्तरावर युद्धजन्य स्थितीचा सराव होणार आहे. ही मॉक ड्रिल युद्धादरम्यान झाली. विशेष बाब म्हणजे, पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंटमध्ये रविवार व सोमवारी रात्री ब्लॅकआउट सराव करण्यात आला. या काळात, गावे आणि परिसरात रात्री 9 ते 9.30 या काळात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.