(पुणे)
चित्रपटात नायक शेवटच्या क्षणी जिवंत होतो असा ट्विस्ट वास्तव जीवनात घडल्याचे आश्चर्यकारक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. 2015 च्या केदारनाथ पुरामध्ये बेपत्ता झाल्यामुळे मृत घोषित केलेला शिवम, तब्बल 10 वर्षांनंतर पुण्यात जिवंत आढळला. पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून प्रथमच बंदी मनोरुग्णाचं कौटुंबिक पुनर्वसन करण्यात आलं.
केदारनाथ पूरातील हजारो भाविक बेपत्ता; शिवमही वाहून गेला
2015 मध्ये केदारनाथ येथे अचानक झालेल्या अतिवृष्टीने व्यापक हाहाकार माजवला. पावसामुळे नद्या रौद्ररूप धारण करताच अनेक भाविक, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यात शिवमही बेपत्ता झाला. काही वर्षे शोधाशोध करूनही तो न सापडल्याने कुटुंबीयांनी त्याचे प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले.
शिवमच्या भावाशी संवाद साधताना त्यानं सांगितलं की, 2015 साली केदारनाथमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शिवम वाहून गेला होता. शिवम केदारनाथ येथील मंदिरात सेवा करत होता. तो तिथंच रहात होता. त्याचा शोध नातेवाईक यांनी विविध प्रकारे लावला, पण तो सापडला नाही. सरते शेवटी त्याला नातेवाईक यांनी मृत घोषित केल होतं.
चोरीच्या प्रकरणातून मिळाला धागा; शिवम पुण्यात सापडला
काही वर्षांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीच्या एका प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव शिवम असल्याचे समोर आले. न्यायालयात हजेरी दरम्यान मानसिक आजाराचे निदान झाल्याने त्याला 2021 मध्ये पुणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवम ‘पहाडी हिंदी’ भाषिक असल्याने संवादात अडचणी येत होत्या. रुग्णालयातील रोहिणी भोसले यांनी शिक्षणाबद्दल विचारले असता शिवमने “प्रेम विद्यालय, रूरकी गाव, हरिद्वार” अशी माहिती दिली. या सुगावावरून रोहिणी भोसले यांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि अखेरीस शिवमच्या गावाशी संपर्क साधण्यात यश मिळाले.
कुटुंबीयांना झाला धक्का; व्हिडिओ कॉलवर शिवम ‘जिवंत’
शिवमच्या नातेवाईकांना जेव्हा कळले की ज्याला मृत घोषित केले, तो जिवंत आहे, तेव्हा त्यांनी आश्चर्याने विश्वासच ठेवला नाही.
रुग्णालयाने व्हिडिओ कॉलद्वारे शिवम आणि त्याच्या कुटुंबीयांना एकत्र आणले, तेव्हा घरात भावनिक वातावरण निर्माण झाले.
शिवमवर दाखल असलेल्या प्रकरणाची चार्जशीट उशीरा तयार झाली. तपासात समोर आले की इतर आरोपींनी स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी शिवमचे नाव घेतले होते. न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ रखडली, न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या, पण रोहिणी भोसले यांनी दोन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला. शेवटी छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयाने वैजापूरला निर्णय देण्याचे आदेश दिले आणि शिवमला निर्दोष मुक्त करण्यात आले.
न्यायालयात काहीही विचारलं तरी ही व्यक्ती प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर देत असे ते म्हणजे “ॐ नमः शिवाय.” कोणतीही वैयक्तिक माहिती, ओळख, पत्ता किंवा भूतकाळाविषयी विचारलं तरी त्याचं उत्तर बदलत नसे. मानसिक अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहातील मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान स्टाफला त्यांच्या खरी ओळखीबाबत कोणताही धागा सापडत नव्हता. ओळख पटत नसल्याने आणि सतत “शिव” असा उल्लेख ऐकू येत असल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्पुरतं नाव दिलं ‘शिवम’. हे त्यांचं खरं नाव नसून, फक्त उपचार आणि नोंदींसाठी स्टाफकडून दिलेली ओळख होती. त्यांचं वय अंदाजे 50 ते 52 वर्षांदरम्यान असल्याचं डॉक्टरांनी नमूद केलं.
कायद्याची व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवमला त्याच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले. या प्रक्रियेत डॉ. शमा राठोड, डॉ. वर्षा बेडगकर, डॉ. इंगळे, डॉ. अमित गोसावी, कविता गाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले.

