(रत्नागिरी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत घेतलेल्या जाहीर सभेला अभूतपूर्व गर्दी झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील शासकीय जलतरण तलाव परिसरात आयोजित जाहीर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राजापूर, लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांतील महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपचे जिल्हा संयोजक दीपक पटवर्धन यांच्यासह शिवसेना–भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
भगवा फडकवूया: गृहराज्यमंत्री योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थितांना संबोधित करत रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले. “रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विकास, सुरक्षा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या शिवसेनेला पुन्हा सत्तेत आणण्याची हीच वेळ आहे,” असे त्यांनी सांगितले. महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महायुतीची सत्ता अटळ: उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आक्रमक भूमिका घेत रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची सत्ता येणारच, असा विश्वास व्यक्त केला. “दोन कोटी चाळीस लाख माता-भगिनींचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. या निवडणुकीत जो कोणी अडथळा आणेल, त्याला तगडा प्रतिउत्तर दिले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ६१ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची घोषणा करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा या उपक्रमात समावेश असेल. कोकणातील रोजगारासाठी मोठ्या कंपन्यांचे भूमिपूजन व उद्घाटन पुढील वर्षी होणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजना कधीही बंद होणार नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडेतोड टीका करत राज्यातील विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सन्मान योजना, पीक विमा, एसटी सवलत आणि ‘लेक माझी लाडकी’सह अनेक योजना राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “‘लाडकी बहीण’ योजनेवर दरवर्षी ४५ हजार कोटी रुपये खर्च होतो. ही योजना कधीही बंद होणार नाही. योग्य वेळी दरमहा २१०० रुपये दिले जातील,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. या योजनेमुळे महिलांचा आत्मसन्मान वाढला असून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अर्थसंकल्पातून कोकणला योग्य न्याय मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकणच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांना बाजूला सारण्याचे आवाहन करत, आम्ही सर्वसामान्य जनतेला नेमके काय मिळाले याकडे लक्ष देतो, असे त्यांनी सांगितले. काही जण प्रॉपर्टी, संपत्ती आणि पैशांची गणिते मांडतात; मात्र आम्ही किती माणसांचे प्रेम जिंकले, किती लोक जोडले गेले हे महत्त्वाचे मानतो. आमचा अजेंडा खुर्ची किंवा सत्ता नसून जनतेशी असलेले नाते आणि विश्वास आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
कोकण ‘ग्लोबल व्हिलेज’कडे
कोकणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ११ ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. स्थानिक तरुणांना कोकणातच रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे लागणार असल्याचे सांगत, “सर्व पदांपेक्षा ‘लाडका भाऊ’ हीच माझी खरी ओळख आहे,” असे भावनिक विधान त्यांनी केले.
विकास, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा
ग्रीन हायवे, महामार्ग, खाड्यांवरील पूल आणि बीच कनेक्टिव्हिटीमुळे कोकणाचा कायापालट होणार असल्याचे शिंदे म्हणाले. महिलांच्या आरोग्यासाठी मोफत तपासण्या, कर्करोग उपचार, वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि बालरुग्णांसाठी विशेष उपचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. “रत्नागिरीला सर्वाधिक निधी दिला आहे,” असा दावाही त्यांनी केला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय का होईल, हे वेगळे काही सांगण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री असताना आपण अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या, विकास प्रकल्प मार्गी लावले आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणले, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या काळात उद्योगमंत्री आपल्यासोबतच होते आणि त्यांनी आताही परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणली आहे, असे त्यांनी नमूद केले.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथे भेट देऊन महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आकर्षित केली. यामुळे राज्यात नवे कारखाने आणि उद्योग उभे राहत असून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे भविष्यात तरुणांना कामासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, तर आपल्या जिल्ह्यातच रोजगार मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण विकास हाच महायुतीचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट करत शिंदे यांनी धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हांवर मतदान करण्याचे आवाहन करत त्यांनी भाषणाची सांगता केली.
या सभेला शिवसेना–भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

