(मुंबई)
मुंबई महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना कायम ठेवली आहे, ती सदस्यसंख्या २२७ अशीच आहे. प्रत्येक प्रभागात सरासरी ४५ ते ६५ हजार लोकसंख्या ठेवण्यात आली आहे. नागरिकांना त्यांच्या हरकती व सूचना ४ सप्टेंबरपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयात नोंदवता येणार आहेत. शहरभर २७ ठिकाणी सूचना नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक मनपा: रचना बदल नाही, १२२ सदस्य कायम
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या १२२ अशीच कायम ठेवण्यात आली आहे. यात २९ प्रभाग ४ सदस्यीय तर २ प्रभाग (प्रभाग क्र. १५ आणि १९) हे ३ सदस्यीय असतील.
कल्याण-डोंबिवली: ३१ प्रभाग, १२२ सदस्य
कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण ३१ प्रभागांची रचना करण्यात आली असून १२२ सदस्यांची निवड होणार आहे. त्यात २९ प्रभाग चार सदस्यीय असून उर्वरित २ प्रभाग प्रत्येकी ३ सदस्यीय असतील.
पुणे महापालिका: १६४ सदस्य, ४० प्रभाग चार सदस्यीय, एक पाच सदस्यीय
पुणे महापालिकेनेही आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. एकूण ४१ प्रभागांमध्ये १६४ सदस्य निवडले जाणार आहेत. यातील ४० प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे. पुणेकरांना त्यांच्या सूचना आणि हरकती २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत, तसेच ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे मनपा भवनच्या स्वागत कक्षात नोंदवता येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका: १२८ सदस्य, ३२ प्रभाग
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली असून प्रत्येक प्रभाग चार सदस्यीय आहे. त्यामुळे एकूण १२८ सदस्यांची निवडणूक होणार आहे. नागरिकांना ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येतील. त्यानंतर ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान सुनावणी पार पडेल. त्यानंतर पालिका आयुक्त १५ सप्टेंबरपर्यंत नगरविकास विभागाकडे अंतिम रचना सादर करतील.
संपूर्ण वेळापत्रक वेळेत पूर्ण करण्यावर भर
राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर हरकती-सूचना, सुनावणी आणि अंतिम रचना यासाठीची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुका फेब्रुवारी 2026 मध्ये
दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा बार उडणार असला तरी प्रत्यक्षात महापालिका निवडणुका थेट पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. कारण, दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी फटाके फुटणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या निवडणुका 3 टप्प्यांमध्ये घेण्यात येतील, अशी माहिती मिळते. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, दुसऱ्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायती, तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात या महापालिकांच्या निवडणुका होतील. तिन्ही टप्प्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दिवाळीनंतर किमान 3-4 महिने जातील.

