(पुणे)
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला, असं जाहीर केलं. मात्र त्यांच्या राजीनाम्याबाबत राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धनखड यांचा राजीनामा हा केवळ औपचारिकता असून, त्यांना प्रत्यक्षात पदावरून काढून टाकण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप केला.
“मी याला राजीनामा मानत नाही. ही फक्त औपचारिकता होती. धनखड यांना जबरदस्तीने पदावरून हटवलं गेलं आहे. कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे. अंतर्गत वादामुळे ही कारवाई झाली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी अशा व्यक्तीची नेमणूक करणेच चुकीचं होतं. आज त्याचा फटका सरकारला बसतोय. ‘दाल में कुछ काला आहे’,” असा टोला त्यांनी लगावला.
चव्हाण आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भेट घेतली. त्यानंतर केसरी वाड्यात रोहित टिळक यांच्याकडे जाऊन सात्वनपर भेट दिली. याच वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी धनखड यांच्याविषयी हे वक्तव्य केलं.
लोकशाहीची अवस्था लज्जास्पद – विधानभवनातील घटनांवर टीका
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांकडून झालेली मारहाण, विधानसभेत गुंडांचा प्रवेश, आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ यावरही चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. “लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात जे चाललं आहे ते अत्यंत लज्जास्पद आहे. याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. विधीमंडळात बेशिस्त वर्तन सुरु आहे, हे दुर्दैवी आहे,” असं ते म्हणाले.
“रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा दोष की जुगाराला परवानगी देणाऱ्या सरकारचा?”
कोकाटे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत चव्हाण म्हणाले, “कृषीमंत्री रमी खेळतात म्हणून त्यांना दोष द्यायचा का? की ऑनलाईन जुगाराला अधिकृत मान्यता देणाऱ्या केंद्र सरकारला? मोदी सरकारने ऑनलाईन जुगार अधिकृत केला आणि त्यावर कर गोळा केला जातो. मात्र त्यामुळे अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.” कोकाटे यांच्या संभाव्य राजीनाम्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, “राजीनामा द्यायचा की नाही हे ज्यांनी त्यांना मंत्री केलं त्यांनी ठरवायचं. मात्र जनतेला आता लक्षात येऊ लागलंय की त्यांनी चुकीच्या लोकांना निवडून दिलं आहे. आज जी परिस्थिती आहे ती लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.”