(रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील व्हेळ गावातील खळबळजनक हत्येप्रकरणात अडकलेल्या प्रतीक शिगम या युवकाला तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात रत्नागिरी लोक अभिरक्षक कार्यालयाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्याय मिळाल्याची नोंद असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही धक्कादायक घटना ९ मार्च २०१९ रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली होती. प्रतीक शिगम (वय २१) हा आपल्या घरात गाणी ऐकत असताना आवाज जास्त झाल्याने काका एकनाथ शिगम आणि काकू वनिता शिगम यांनी त्याला शिवीगाळ केली. त्या वादातून तिघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि दगडफेक झाली. यात काका-काकी गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडले, तर प्रतीकच्या डोक्याला रक्ताळलेली गंभीर जखम झाली.
या प्रकरणात काकाच्या मुलीच्या तक्रारीवरून लांजा पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अंतर्गत खूनाचा गुन्हा नोंदवून प्रतीकला अटक केली. तो दिवसापासून तो सातत्याने तुरुंगातच होता. मात्र, प्रकरणाची सुनावणी अनेक वर्षे प्रलंबित राहिली होती. संबंधित घटनेवेळी आरोपीचे वय लक्षात घेता आणि परिस्थितीचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन डी. भौबे यांनी त्याला जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयाने त्याच्यावर काही अटी घालून, सुनावणी व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेशास बंदी घातली आहे.
या जामीन प्रक्रियेसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत रत्नागिरी लोक अभिरक्षक कार्यालयाचे प्रमुख अॅड. अजित वायकुळ यांनी सुसूत्रपणे पाठपुरावा करत मुंबई उच्च न्यायालयातील विधी सेवा समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. या समितीकडून नेमण्यात आलेल्या बचाव पक्षाचे वकील अॅड. अजित सावगावे यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. या निर्णयामुळे प्रतीकला सहा वर्षांनंतर हवेचा श्वास घेता आला असून, लोक अभिरक्षक कार्यालयाच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी माहिती अॅड. वायकुळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.