(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती, तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत तालुक्यातील विविध गावांमध्ये वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजात धम्मचिंतन वाढवणे, बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रसार व प्रबोधन करणे असा आहे.
कार्यक्रमाचा शुभारंभ १० जुलै रोजी, आषाढ पौर्णिमेला रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (वसतिगृह) येथे होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपन्न होणार असून त्याला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुख्य अतिथी म्हणून बौद्धजन पंचायत समिती, मुंबईचे अतिरिक्त सरचिटणीस मंगेश साळवी, तसेच पर्यटन समितीचे अध्यक्ष आणि कवी मुकुंद महाडिक हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही मान्यवर धम्मप्रबोधन व समितीच्या कार्यपद्धतीविषयी विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, तसेच संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे व चिटणीस रविकांत पवार यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या वर्षावास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये बौद्ध शाखांच्या माध्यमातून धम्मप्रवचन, विचारमंथन व बौद्ध सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये भिक्खू संघ, श्रामणेर आणि धम्मप्रेमींनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका शाखेच्या विविध उपसमित्यांचे प्रमुख व गावशाखांचे पदाधिकारी सज्ज झाले असून, “तालुक्यातील सर्व बौद्धाचार्य, श्रामणेर, तसेच गावशाखांतील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा,” असे आवाहन अध्यक्ष प्रकाश पवार, चिटणीस सुहास कांबळे, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, आणि रविकांत पवार यांनी संयुक्तपणे केले आहे.