(महाड)
महाड-दापोली राज्य मार्गावर मे महिन्यापासून सुरू झालेल्या अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नाही. बुधवारी (२३ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास मांडवकर कोंड गावाजवळ एसटी बस घसरून झालेल्या अपघातात चालक, वाहकासह एकूण १० प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बस रस्त्यावरून घसरली; पावसामुळे अपघात
पुणे (पिंपरी-चिंचवड) आगाराची ‘पुणे फौजी अंबवडे–अहिरे कोंड’ ही एसटी बस (एमएच-०७-सी-९०४३) मांडवकर कोंड गावाजवळ उतारावर असताना रस्त्यावरील सततच्या पावसामुळे झालेल्या निसरड्या स्थितीतून घसरली. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला गेली आणि मोठा अपघात घडला.

या अपघातात चालक अविनाश पांडुरंग लोखंडे (३४, रा. पिंपरी-चिंचवड) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तर महिला वाहक पौर्णिमा प्रमोद होनकडसे (४६, रा. पुणे) यांच्याही हाताला आणि कमरेस मोठी इजा झाली आहे. त्यांना शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी त्यांच्या खाजगी वाहनातून तातडीने रुग्णालयात दाखल केले. इतर जखमी प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि अल्पवयीन विद्यार्थी यांचा समावेश आहे. महाशक्ती ॲम्बुलन्सचे अनिल चव्हाण यांनी काही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले.
जखमी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे:
-
अविनाश पांडुरंग लोखंडे (३४) – चालक, पिंपरी-चिंचवड
-
पौर्णिमा प्रमोद होनकडसे (४६) – महिला वाहक, पुणे
-
आशाबाई नारायण जाधव (७५) – फौजी अंबवडे
-
शारदा गजानन शेलार (६७) – फौजी अंबवडे
-
सोहम ज्ञानेश्वर पवार (१७) – फौजी अंबवडे
-
सिमाब सिकंदर पेडेकर (१६) – शिरवली
-
सलवा अब्दुल सलाम पेडेकर (१७) – शिरवली
-
आराधना दिगंबर पवार (१८) – फौजी अंबवडे
-
लहू सखाराम पाते (५५) – पांगरी
-
विश्वजीत सोपान कदम (२७) – शिरवली
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. दरम्यान, महाड-दापोली मार्गावर अपघातांची संख्या वाढत असून, रस्त्याची निकृष्ट अवस्था त्याला कारणीभूत ठरत आहे. मे महिन्यात एफएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीने निकृष्ट दर्जाचे डांबर वापरून शिलकोट केल्याचे आरोप होत असून, त्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या अपघातांना जबाबदार नेमकं कोण? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

