(दापोली /रत्नागिरी)
घराच्या मागील पडवीत भांडी घासत असताना ४९ वर्षीय महिलेला सर्पदंश झाला. सर्पदंशानंतर उपचारासाठी प्रथम दापोली उपजिल्हा रुग्णालयात, त्यानंतर अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. कविता किसन खापरे (वय ४९, रा. उन्हवरे-जाधववाडी, पो. वावघर, ता. दापोली) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिस नोंदीनुसार, कविता खापरे या त्यांच्या गावी घरी होत्या. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील पडवीत पायरीजवळ त्या भांडी घासत होत्या. याचवेळी त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला सापाने दंश केला. सर्पदंशामुळे अंगठ्यातून रक्तस्राव होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दापोली उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
मात्र, प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन अधिक उपचारांसाठी त्यांना रुग्णवाहिकेतून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. १८ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच १९ सप्टेंबर रोजी पहाटे ४.१३ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.


