(नवी दिल्ली)
भारतीय निवडणूक आयोगाने मोठा बदल जाहीर केला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपासून ईव्हीएमवर (EVM) उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार आहेत. समान नावाच्या उमेदवारांमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारीवर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराची योग्य ओळख करून मतदान करणे अधिक सुलभ होणार आहे.
काय बदल होणार?
- ईव्हीएम मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जातील.
- फोटोमध्ये उमेदवाराचा चेहरा तीन-चतुर्थांश भाग व्यापेल, ज्यामुळे तो स्पष्ट दिसेल.
- सर्व उमेदवारांची नावे आणि NOTA (नोटा) एकाच फॉन्टमध्ये, फॉन्ट आकार 30 मध्ये छापली जातील.
- ईव्हीएम मतपत्रिका ७० जीएसएम वजनाच्या गुलाबी कागदावर छापल्या जातील.

पुढील सर्व निवडणुकांतही अंमलबजावणी
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, हे बदल केवळ बिहारपुरते मर्यादित नसून, त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये हीच प्रक्रिया पाळली जाणार आहे.

