(मुंबई)
मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्त्वावर नियुक्त ८७ कर्मचाऱ्यांच्या सेवेला अखेर नियमिततेचा दिलासा मिळाला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ही माहिती दिली. मंत्रालयात झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या सेवांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
या बैठकीत बोलताना मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांसाठी १५० दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंधाचे अद्ययावतिकरण, नियुक्ती नियमांचे सुधारणा आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती १०० टक्के करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्त्वावर असलेल्या नियुक्त्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नियोजनबद्ध प्रक्रियेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवांना नियमिततेचा दर्जा देण्यात आला आहे.
मंत्री पाटील यांनी यावेळी निर्देश दिले की, सध्या उच्च व तंत्र शिक्षण विभागात असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील सर्व रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन ती पदे १०० टक्के भरली जावीत. यासाठी विभागीय स्तरावर आवश्यक ते उपाय तातडीने राबवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.

