अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक व जन शिक्षण संस्था रायगडचे माजी अध्यक्ष अविनाश मनोहर ओक यांनी पेण रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना त्यांच्या शर्टाच्या खिशात एक चिट्ठी सापडली. त्या चिट्ठीत ‘मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये‘ असे लिहले होते.
ओक हे पेण येथील ‘आई डे केअर’ या संस्थेत भेट देण्यासाठी आले होते. यानंतर ते स्वतःच्या गाडीने तिथून निघून गेले, जात असताना त्यांनी स्वतःची गाडी रेल्वे स्थानकाच्या समोर उभी केली. त्यानंतर त्यांनी स्थानकात येणाऱ्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. यानंतर अविनाश ओक यांचा मृतदेह अलिबाग येथे नेण्यात आला. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पेण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सदर घटनेचे वृत्त समजताच माजी खासदार किरीट सोमेय्या हे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी पेण पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली.
प्राध्यापक अविनाश ओक यांचे मूळ गाव माणगाव होते. त्यांचे वडील (आबा) मनोहर ओक हे प्रसिद्ध वकील होते. प्राध्यापक अविनाश हे कामानिमित्त अलिबागला स्थायिक झाले होते. इथल्या जे.एस.एम कॉलेज येथे राज्यशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक होते. याच दरम्यान त्यांनी जनशिक्षण संस्था रायगडचे अध्यक्षपद भूषविले होते. तर त्यांच्या पत्नी अलिबाग येथील कमळ नागरी संस्थेच्या संचालक आहेत. एकूणच प्राध्यापक ओक यांचे सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात मोठे कार्य होते.