( विशेष /प्रतिनिधी )
“हे आमचं शेत, ही आमची बागायत आणि हे निसर्गरम्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत… आम्हाला आमचे शांत, समाधानाचे आयुष्य हवे आहे, एमआयडीसी नको!” अशा स्पष्ट आणि ठाम शब्दांत वाटद परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासमोर आपली भूमिका मांडली.
बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांनी प्रस्तावित वाटद एमआयडीसी प्रकल्प परिसराला भेट देत शेतशिवार, बागायती आणि निसर्गसंपन्न भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात एमआयडीसी विरोधकांनी त्यांना वाडीवस्त्यांत फिरवून प्रकल्पाविरोधातील कारणे आणि आपली भावनिक बांधिलकी ठामपणे समजावली. या दौऱ्यात एक अनोखा क्षण ही पाहायला मिळाला. विकासविरोधातील संघर्ष, पर्यावरणाचे संवेदनशीलतेने जपलेले प्रश्न आणि ग्रामस्थांचा रोष यामध्ये जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी आपली मानमरातबाची चौकट बाजूला ठेवून, बूट काढतो, पाण्यातून चालतो, कातळावरून चालत गावकऱ्यांशी संवाद साधतो, तेव्हा ती केवळ भेट नसते, ती लोकसेवेची खरी जाणीव असते.

रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाटद एमआयडीसी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांच्या भावना समजून घेण्यासाठी अशाच एका अभूतपूर्व कृतीने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी स्वतःचे बूट काढून हातात धरले, आणि उंचसखल भाग, पाण्याच्या प्रवाहातून प्रत्यक्ष वाडीवस्तीत जाऊन पाहणी करत गावकऱ्यांशी संवाद साधला. ही कृती केवळ औपचारिक दौरा नव्हता, तर ती ‘माणसात मिसळण्याची तळमळ’, प्रशासन आणि जनतेतला दुवा सशक्त करण्याची सच्ची जाणीव होती. या कृतीने त्यांनी एक गोष्ट सिद्ध केली की, पद मोठे असले तरी लोकांच्या सेवेपुढे तो वावगाच. आज जेव्हा प्रशासनावर तक्रारींचे सावट आहे, तेव्हा अशा अधिकाऱ्यांच्या कृती नागरिकांमध्ये प्रशासकीय विश्वासाचे नवे बीज पेरत आहेत. सेवा म्हणजे हातात सत्तेचा डंडा नव्हे, तर जनतेच्या डोळ्यात डोकावण्याची संवेदनशील नजर असते, हेच पोलिस अधीक्षक बगाटे यांनी दाखवून दिले आहे.
आमचे आयुष्य सुखरूप चालले आहे. निसर्गाची साथ आहे, शेती फुलतेय. अशा ठिकाणी औद्योगिक प्रकल्पांची गरज नाही, असे मत आंदोलक प्रतिनिधी प्रथमेश गवाणकर यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले, पोलीस अधीक्षक आमच्या सोबत गावात फिरले, बागायती पाहिल्या. ते पहिले आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांनी आमचे म्हणणे थेट ऐकून घेतले. या दौऱ्यानंतर जयगड पोलीस ठाण्यात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आणि सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील उपस्थित होते.
“ग्रामस्थांनी त्यांचे मुद्दे मांडले. आम्ही स्वतः प्रत्येक वाडीला भेट देत सरकारचे मुद्दे मांडले. विकासासाठी एमआयडीसी कशी आवश्यक आहे हे मुद्दे मांडले. गावागावात जाऊन लोकांची भेट घेतली.”
– नितीन बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी
आता सरकार जनतेच्या भावना ओळखणार का?
काही दिवसांपूर्वीच वाटद परिसरात ग्रामस्थांनी मोठा मोर्चा काढून जनसंवाद सभा घेतली. प्रशासनानेही त्याची दखल घेत आता थेट गावागावात संवाद सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा दौरा, त्यातील प्रत्यक्ष पाहणी आणि ग्रामस्थांच्या भावना ऐकण्याची पद्धत हे सारेच लक्षवेधी ठरत आहेत. ग्रामस्थ निसर्ग, शेती आणि पारंपरिक जीवनशैलीच्या रक्षणासाठी उभे आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाच्या मते, विकासासाठी औद्योगिक प्रकल्प अपरिहार्य आहेत. या साऱ्या घडामोडींमध्ये दोन्ही बाजू आपल्या-आपल्या भूमिका ठामपणे मांडत आहेत. परंतु या साऱ्या घडामोडींनंतरही एक प्रश्न कायम उभा राहतो आहे की, ग्रामस्थांच्या भावना फक्त अधिकाऱ्यांपर्यंतच मर्यादित राहणार का? की शासन त्यांचा गांभीर्याने विचार करणार आहे? शेती, निसर्ग आणि पारंपरिक जीवनशैली जपणारे वाटद औद्योगिक विकासाचे नवे केंद्र बनणार की जनआंदोलनाच्या दबावाखाली सरकारला माघार घ्यावी लागणार?