(देवरूख / प्रतिनिधी)
आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्राच्या इतर भागांतून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेऊन गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्यांची संख्या गतवर्षीपेक्षा अधिक वाढवावी, अशी मागणी केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्री वैष्णव यांनी विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
गणपती उत्सव हा कोकणवासीयांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि पारंपरिक सण आहे. यानिमित्ताने हजारो भाविक, विशेषतः मुंबई व पुण्यातून आपल्या मूळगावी कोकणात जातात. या प्रवासात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने आरक्षण मिळवणे अडचणीचे ठरते. याच पार्श्वभूमीवर खा. राणे यांनी गेल्या वर्षीच्या ३४२ विशेष गाड्यांपेक्षा यंदा अधिक गाड्या चालवाव्यात, अशी मागणी करत रेल्वे मंत्र्यांना लेखी निवेदन दिले.
खा. राणे यांनी खालील महत्त्वाच्या मागण्या यावेळी मांडल्या:
- मुंबई, पुणे आणि इतर शहरे – चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग, सावंतवाडी आदी कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान विशेष गाड्यांची संख्या वाढवावी.
- प्रवासी योजना वेळेत करता यावी यासाठी आरक्षण पूर्वसूचना व वेळेवर सुरू करावी.
- स्लीपर व जनरल डब्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याचा विचार करावा.
- विशेष गाड्यांचे मार्ग विस्तारित करून कोकणातील जास्तीत जास्त गावांशी जोडणी करावी.
या बैठकीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गणेशोत्सवात भाविकांना तिकीट आरक्षणात कोणतीही अडचण येऊ देणार नाही, याची ग्वाही दिली. तसेच वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकर प्रस्तावित करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनास दिले.
संगमेश्वर स्टेशनला दोन गाड्यांचा नवा थांबा शक्य
खा. राणे यांनी संगमेश्वर रोड स्टेशनवर अधिक गाड्यांचा थांबा देण्याची मागणी देखील यावेळी पत्राद्वारे केली होती. या संदर्भात कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने १० जुलै २०२५ रोजी रेल्वे बोर्डास दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे की, 19577/19578 जामनगर–तिरुनेलवेली एक्सप्रेस व 20910/20909 पोरबंदर–तिरुवनंतपुरम एक्सप्रेस या गाड्यांचा संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देणे व्यावसायिकदृष्ट्या शक्य आहे. सध्या येथे १२ गाड्या थांबतात, ज्यात १० दैनिक एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या स्टेशनवरील तिकीट विक्री व उत्पन्न समाधानकारक असल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयांमुळे गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुकर आणि सुलभ होणार असून रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यामुळे कोकणात गणेशोत्सव आणखी आनंदात आणि जल्लोषात साजरा होणार आहे.

