(रत्नागिरी)
शहरातील कोकण रेल्वे स्थानकावरील वातानुकुलित उच्च तिकिटधारक प्रवासी कक्ष (एसी एक्झिक्युटिव्ह लाऊन्ज) येथून २५ हजार रुपये रोख चोरीप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी काही तासांत कारवाई करत नाशिक येथील तरुणास अटक केली असून, संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही घटना ६ जून २०२५ रोजी घडली. तेजस अजित छाबडा (वय ३२, रा. इगतपुरी, जि. नाशिक) या तरुणाने दर तासाच्या भाड्याने लाऊन्जमध्ये रूम घेतली होती. संधी साधून त्याने रिसेप्शन टेबलमधील ड्रॉवरमध्ये ठेवलेला २५,००० रुपयांचा रोख रकमेचा डबा चोरून पलायन केले.
कुवारबांव पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ लाऊन्जमध्ये येऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. आरोपी रिक्षात बसलेला दिसल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्टेशन ते एसटी स्टँड या दरम्यान पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण २५,००० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २३९/२०२५ नुसार भारतीय दंड विधान कलम ३०५(अ) अंतर्गत नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिवरकर व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईत सहाय्यक फौजदार दीपक साळवी, पोहेकॉ अरुण चाळके, संतोष गायकवाड, महेंद्र खापरे, राकेश तटकरी, निलेश कांबळे आणि चालक ओंकार सावंत यांचा महत्त्वाचा सहभाग होता.