(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावची ग्रामदैवता श्री चंडिका देवीचा शिमगोत्सव कार्यक्रम दोन मार्चपासून सुरू होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण शिमगोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा श्रीदेवी चंडिका मंदिर व्यवस्थापक समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता ग्रामदैवता श्री चंडिका देवीच्या मंदिरात रूपे लावणे, त्यानंतर दुपारी 3.00 वाजता मंदिरात सभा व होळी तोडणे, सायंकाळी सात वाजता होळी आणणे तसेच मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता मंदिरातून पालखी उठवणे, सकाळी नऊ वाजता माड(होळी) उभा करणे, सकाळी दहा वाजता होम लावणे आणि रात्री दहा वाजता मालगुंड येथील श्री चंडिका हौशी नमन मंडळाचा नमन कार्यक्रम, गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत भगवती महिला मंडळाचे हळदी कुंकू, त्यानंतर चार ते सहा या वेळेत चंडिका महिला मंडळाचे हळदीकुंकू पार पडणार आहे.
अशा प्रकारे श्री चंडिका देवीचा शिमगोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीभावात संपन्न झाल्यानंतर ग्रामदैवता श्री चंडिका देवीची पालखी गाव भेटीसाठी बाहेर पडणार आहे. यासाठी वाडीवस्तीप्रमाणे रूपरेषा ठरविण्यात आली आहे. त्यामध्ये रविवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी आठ वाजता रंगपंचमीच्या दिवशी होळी तोडून प्रस्थान वरचा वठार सायंकाळी पाच वाजता, वस्तीचे ठिकाण कालिका मंदिर. त्यानंतर 9 मार्च रोजी सकाळी आठ वाजता प्रस्थान मराठवाडी, आडी आणि खालचा वठार ते विकास साळवी घर तसेच मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी आठ वाजता प्रस्थान अवचितवाडी सायंकाळी चार वाजता धावडेवाडी अशाप्रकारे देवीचे प्रस्थान 10 एप्रिल पर्यंत गावातील विविध वाड्यांमध्ये राहणार असून 12 एप्रिलला चैत्री दुपारी दोन वाजता आणि 13 एप्रिल रोजी गोंधळ रात्रौ आठ वाजता होऊन शिमगोत्सव कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

